1. सुबोध सराफ
अतिशय आवडणारा विषय….प्रेरणा हा शब्दच प्रेरणादायी आहे…खर तर प्रेरणा अगदी कुठूनही मिळू शकते …लहानग्याच्या नैराजस हास्यातूनही मिळते …आणि ते थेट हिटलरच्या आत्मचरित्रातूनही मिळतेच….आपण ठरवायचय कि आपणास नक्की काय हव आहे ते…एक प्रसंग मला कायम आठवतो …अर्थात काॅलेज मध्ये असतांना..घडलेला …तेव्हा आता सारखी चकचकीत मल्टीप्लेक्स थिएटर नव्हती….सिंगल स्क्रीन टाॅकिज असायच्या तिकिटांच्या साठी हे भली मोठी लाइन असायच्या…थर्ड्क्लास ..सेकंडरी क्लास …बाल्कनी…आम्ही बहुतेक सेकंड क्लासच्या लाइनीत असायचो …कसंही करून तिकिट मिळवायचा ही जिद्द…घरी परत जायचे नाही…हे ठरलेलं.. मग काय….धक्काबुक्की…झटापट …कसरत करून ..महत्प्रयासाने…खिडकी पर्यंत धडकून…कसाबसा ..आतमध्येहात घालून…हातामधे तिकिट मिळाल्याची खात्री झाल्यावर…विजयी मुद्रेने त्या …लाईनीतून बाहेर पडायचो…मग जो काही आनंद मिळायचा तो औरच असायचा….आता तुम्ही मूहणाले यातून काय रोजची प्रेरणा मिळणार…पण थोड बारकाईने पाहिल तर …काम फत्ते करण हे शिकायला मिळाल….काहीही करून …धक्के ..मार. सहन करून…प्रसंगी मार देऊन देखिल…वाट्टेल ते झाल तरी तिकीट हे मिळवायचच….आणि ते सगळ्यांसाठी असायच ना…एक गृप अॅक्टिव्हिटी असायची ना ती….आता कुठल्या प्रसंगातून…काय शिकायच आपण ठरवायचं….पण प्रेरणा मिळते हे नक्की…..
************************************
2. शुभम जाधव
अहमदनगर..
आज पाहिल्यांदा मी काव्यरचना न करता लेख लिहत आहे. विषय पाहताच लिहण्याचे मन झाले, पाहिल्यांदा लिहितोय म्हणुन काही चुकले तर सांगावे आणि चुकीसाठी क्षमस्व!
प्रत्येकजण आपल्या आई-वडीलांना किंवा आपल्या आवडत्या गुरुला आपली रोजची प्रेरणा मानतो, तसा मी पण मानतो. पण त्याचबरोबर मी माझी आणखी एक प्रेरणा मानतो, ती म्हणजे जिंदगी….
जिंदगी अशी प्रेरणा आहे, ती कोणाकडे पाहुन किंवा कोणाला मनात धरुन मिळत नाही. आपल्या स्वतःच्या यशाला,अपयशाला,भावनेला सकारात्मक दृष्टीकोनातुन पाहताना एक नकळत प्रेरणा मिळत असते, ती म्हणजे जिंदगी.
स्वकर्तृवात जिंदगी सकारात्मक कार्यात तसेच नकारात्मक कार्यातही प्रेरणा देते. पण सकारात्मक कार्याला जास्त महत्व देते. काय सकारात्मक आहे आणि काय नकारात्मक हे ओळखण्याचा अनुभव पण जिंदगीच देते. पण माझे एक दुर्भाग्य आहे, ही माझी प्रेरणा बोलत नाही किंवा सांगत नाही. कधी कधी नकारात्मक कार्याला पण इतके महत्व देते की, जो पर्यंत आपण चुकलोय हे कळत नाही तोपर्यंत ही थांबतच नाही. आणि अचानक आपण एवढे चुकतो की, ती फक्त चांगले काय आणि वाईट काय याचेच calculation करायला लावते.
पण या प्रेरणेचे दुसऱ्या प्रेरणेसारखे नाही बर का! या प्रेरणेला मर्यादा आहे. ही एक दिवस संपतेच. ज्या दिवशी संपते त्या दिवशी या जगातल्या कोणत्याही माणसाचे या जगात काहीही आस्तित्व राहत नाही.
ये जिंदगी तु कशीही असली तरी म्हणावे लागतेच,
तुच माझी रोजची प्रेरणा……….
***********************************
3. तेजल तावरे (पुणे )
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणादायी माणसे, प्रसंग, पुस्तके आणि खूप काही गोष्टी असतात. त्यातून ती व्यक्ती प्रेरणा घेऊन स्वतःला उत्तम व्यक्ती म्हणून घडवत असते. पण माझ्या आयुष्याची गोष्ट वेगळी आहे मला कधीच एका ठराविक गोष्टीतून प्रेरणा मिळाली नाही तर मला या संपूर्ण निसर्गाने आणि निसर्गातील प्रत्येक सजीव निर्जीव घटकांने प्रेरणा देऊन माझं आयुष्य छान आणि Unipune घडवलं. पण मला खरी साथ दिली ती सकारात्मक दृष्टिकोनाने. खरं तर आयुष्य सुंदर आणि रसपूर्ण कसं जगायचं हे शिकवलं ते माझ्या बाबांनी (अरूण तावरे ) आणि माझी जवळची मैत्रीण माझी डायरी…. बाबांचे माझ्या आयुष्यातील स्थान वेगळेच आहे ते प्रेम असे आहे की जे कधीच शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. ते रागीट नजरेतून, हळव्या स्पर्शातून आणि आदरयुक्त भीती मधून अनुभवायला मिळाते. कारण प्रत्येकाची प्रेम करण्याची पध्दत वेगळी असते. तसे आम्ही दोघे सारख्याच वृत्ती, प्रवृत्ती आणि मनोवृत्तीचे.. आम्हाला कधी गोड, लाघवी शब्दांत प्रेम व्यक्त करणे जमलेच नाही, या जन्मात ते शक्यही नाही.. बाबांच्या सुचनेतून, खोचक शब्दातून आणि स्पष्ट, खरे बोलण्यातून त्यांचे प्रेम आम्हा भावंडांना मिळत गेले. ते एक अशी मुर्ती आहे की जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला. पुस्तके, चर्चासत्रे, चित्रपट, नाटक, सर्कस, रस्त्यावरचे सिग्नल, गतिरोधक, खड्डे, जीवनात आलेली बरेवाईट क्षण, माणसे यातून मला ते नेहमी घडवतात. बाबा असा माणूस आहे की त्याच्यां प्रत्येक कृती मधून शिकायला मिळते. फक्त तसा दृष्टीकोन पाहणाऱ्या च्या नजरेत असावा. तर हे मुर्तीमंत उदाहरण जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देईल. बाबा म्हणजे म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, ALL ROUNDER, अतिशय बुद्धीमान, उडत्या पाखरांचे पंख मोजणारा अवलिया….. काळानुसार बदलणारा, रोबोटला लाजवेल अशी गॅझेट वापरणारा, पैशापेक्षा विचारांने, कर्तृत्वाने मोठे व्हा असे सांगणारा माझा मितवा(Friend, Philosopher, Guide ). दुसरी गोष्ट माझी डायरी…. मी प्रत्येक क्षण तिथे टिपून ठेवते. विचार, सुविचार, ध्येय आणि खूप काही.. आणि एक कानमंत्र (कुणी कितीही hurt केलं, त्रासदायक वर्तन केलं तरी मोठ्या मनाने माफ करून परत आयुष्याला आणि प्रत्येक नात्याला फुलवण्याची संधी द्यायची जास्त वेळ अबोला धरायचा नाही कारण समोरची व्यक्ती कितीही वाईट वागली तरी आपण तसे वागायचे नाही कारण त्याच्यां वागण्यातून त्यांची वृत्ती स्पष्ट होते आपणही तसेच वागलो तर ते आणि आपण यात फरक तो काय ? ) म्हणून रोज रात्री झोपताना सगळ्यांना आणि स्वतःला माफ करुन सुखाची गाढ झोप घ्यायची आणि रोजचा दिवस उमेदीने जगायचा….. मग कशाला हवी अजून काही वेगळी प्रेरणा……… धन्यवाद
************************************
4. मानसी जोशी ,
पुणे
आयुष्यात प्रत्येकाला कोठून ना कोठून प्रेरणा मिळत असते.
माझ्यासाठी माझे प्रेरणा स्त्रोत मात्र आहे सूर्य…. हो सूर्य….
रोज सकाळी … थोडा पुढे मागे वेळ करून येणार म्हणजे येणारच.. रोजची त्याची कामे… म्हणजे अंधकार दूर करत जाणे… सकाळी सर्वांना ड जीवनसत्व देणे… कोणी किती घेतले हे तो बघत नाही… फक्त देत राहतो…
नंतर काही रोपांसाठी असते त्याचे राहणे.. दुपारी थोडा तापदायक वाटतो पण कडक उन्हाची पण जरूरी असतेच…
संध्याकाळच्या त्याच्या संध्याछाया… मन मोहून टाकतात ..
मला ही असेच वाटते… आजचा दिवस जो मला मिळाला आहे.. मी कोणाच्या तरी असे उपयोगी पडावे की मला परतफेडीची अपेक्षा नसावी…
माझी सकाळची घरातील कामे मी हसतमुखाने केली तर माझे घर आनंदी राहणार आणि पर्यायाने मी सुद्धा…
मी माझे कर्म करीत राहावे… समोरच्याला देता येईल ते देत राहावे…
आपल्या वागण्याने सर्वांना मोहित नाही करता आले तरी आपला त्रास कोणाला होऊ नये ..
************************************
5. प्रतिक सोमवंशी
(श्रीरामपूर )
प्रेरणा, जगण्याला एक नवी दिशा देणारी गोष्ट. आता प्रत्येकाच्या बाबतीत प्रेरणा स्रोत वेगवेगळे असतील त्याबाबत काही दुमत नाही. कुणाला एखाद पुस्तक वाचून प्रेरणा मिळते, कुणाला एखाद्या व्यक्ती कडून, कुणाला निसर्गातून तर कुणाला अभंगातून.
मला मात्र अनुभवातून प्रेरणा मिळते, रोज नवीन नवीन अनुभव पायाशी लोटांगण घालायला येतात, काही पाय धरून आदर देतात तर काही तेच पाय खेचून आपल्याला पाडतात. या अनुभवांच पण एक नवलच आहे, ते सतत आपल्याला काहीना काही शिकवून जातात. अनुभवांना प्रेरणा म्हणण्यामागे सुद्धा एक उद्देश आहे, कारण अनुभव कोणत्या रूपाने तुमच्या समोर प्रकट होतील सांगता येत नाही.
हे अनुभव कधी व्यक्तीच्या रुपात येतात, काम करण्याची नवी उर्मी देऊन जातात. माझ्यासारख्या ज्या ज्या लोकांना समोरच्याचे डोळे वाचता येत असतील त्यांना तर खूपच सोप जाईल समोरच्याचे अनुभव वेचन. तोंडावर सतत हास्य ठेवून जगणाऱ्यांचे डोळे मात्र त्यांना दगा देऊन जातात आणि असे व्यक्ती आपल्या लिखानामागची प्रेरणा बनून जातात. कधी निसर्ग शिकवून जातो, रोज उगवणारा सूर्य, पहाटेचे गोडवे गाणारे पक्षी, रोजचा वाहणारा वारा कोण कुठे जगायची आणि लिहायची प्रेरणा देऊन जाईल देव जाणे.
आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात. ज्याला लाडाने आपण खट्टे मिठे सुद्धा म्हणतो आणि खरच असतात ते तशे. काही अनुभव शरद ऋतूतील चांदण्यांप्रमाणे असतात, अगदी अल्लड, नाचतच येतात आपल्या भेटीला सुखद धक्के घेऊन. काही खूपच अंधरलेली असतात अगदी शिशिरातल्या काळ्या रात्री सारखे, एकदा आले की तेवढा काळ अंधार सोडून आपल्याला काहीच दिसत नाही. ओढल्या जातो आपण त्या अंधारलेल्या रात्रीच्या भयाण शांततेत, जेंव्हा आपल म्हणायला अस चांदण ही उरत नाही. काही अनुभव ढगाळलेले असतात आषाढातील आसमंताप्रमाणे, नभांसारखे दाटून आलेले असतात पण कधी बरसून एकदा रिते होतील आपल्याला पण माहीत नसते. मन जड झालेले असते पण जेव्हा ते वर्षा ऋतूतील अवखळ पाऊसाप्रमाणे बरसते तेंव्हा मनाच्या मेघखंडातील ताण हळूच हलका झालेला भासतो. काही अनुभव वसंतातील इंद्रधनुप्रमाणे असतात, विविध रंगानी नटलेले, नानाविध छटांचा वर्षाव केलेले आणि त्यांना अनुभवन मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात, मन प्रफुल्लित होऊन जात, त्याच्या रसिकतेत अचानक भर पडते. काही अनुभव ग्रीष्मातील उष्णतेप्रमाणे खूप चटके देऊन जातात ज्यांचा दाह कमी होतो पण व्रण मनावरन पुसल्या पुसत नाहीत ऋतूप्रमाणे हे अनुभव बदलत जातात पण त्यांना अनुभवन एक वेगळाच अनुभव देऊन जात. यातच तर आपण जगतो आणि जगायला शिकतो.
************************************
6.कु. ओंकार दिलीप बागल.
(नवी मुंबई)
प्रेरणा म्हणजे एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला नेहमी उत्तेजित ठेवत असते. बऱ्याचदा प्रेरणा आपली कामे पूर्णत्वास नेण्यास महत्वाची ठरते. प्रेरणा खरं तर कुठूनही मिळते, अगदी लहान वाटणाऱ्या मुंगीतूनही. मात्र ती किती चिरकाल टिकते हे देखील तितकंच महत्वाचं. आपण एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचून खूप जोशाने पेटून उठतो, पण ते किती वेळापर्यंत असते हे लक्षात घ्या. एखाद्या चित्रपटात आपण जेव्हा पाहतो कि त्यातील नायक मेहनतीने यश संपादन करतो, तेव्हा आपल्याला ती मेहनत करण्याची ताकद मिळते. मात्र ते तेवढ्या मर्यादित वेळेसाठीच उरतं आणि पुन्हा आपण ‘जैसे थें’, या आपल्या मूळ पदावर येऊन ठेपतो.
स्वतःला प्रेरणादायी ठेवण्यासाठी कित्येक खटाटोप करतील ही तरुण मुलं. प्रेरणादायी गाणी, चित्रफिती, चाललचित्रे, लेख, कथा इ. याच्या पुढे काही असे लोक जे अजूनही पुस्तकांतून प्रेरणा मिळवतात. रोजच्या प्रेरणेसाठी काही न काही तर वाचत राहणे बरेच जण पसंद करतात. मीदेखील यातील कित्येक गोष्टी करून पाहिल्या आहेत मात्र त्या सत्यात उतरवताना तितक्या सफल होताना मला दिसल्या नाहीत. मग असं काय करता येईल किंवा अशी कुठली प्रेरणा जी नित्य आपल्याला जबाबदारीची आठवण करून देईल. यासाठी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बारकाईने पाहाव्यात, त्यासोबतच स्वतःचे सुक्ष्मनिरीक्षण करून घ्यावे. अशा गोष्टींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावे जी आपल्याला खोल मनावर परिणाम करते. मनासोबतंच आपल्या बुद्धीलाही विचार करायला भाग पाडते. एखादी अशी गोष्ट शोधायला हवी, त्यातून उद्देशात्मक प्रेरणा घेन्यास अगदी सोपं होईल आणि बहुदा अशीच प्रेरणा कवयमस्वरूपी मनावर बिंबवली जाईल.
मी सकाळी जेव्हा कॉलेजला जायला निघतो तेव्हा मंदिरात दर्शन घेतो. मंदिराच्या अगदी समोरच एक अपंग मुलांची शाळा आहे. मी रोज सकाळी मंदिरात जायचा वेळ आणि त्या मुलांची शाळेची बस यायची वेळ एकचं होते. सकाळचा वेळ म्हणजे सर्वांची लगबग, कामावर जाण्याची धावपळ आणि माझी वेळेत कॉलेजला पोहोचण्याची घाई. ती अपंग मुलं एक एक करून बस मधून बाहेर पडत होती आणि शाळेत जात होती. खरं तर जात नव्हती त्यांना बळजबरीने शाळेत बसवलं जातंय असचं कुठे तरी वाटायचं. त्यांना तरी कुठे कळतंय इतकं पण शिक्षण महत्वाचं हा त्यामागचा प्रमुख उद्देश. त्या शाळेतील सगळे शिक्षक गेटच्या समोर उभे राहून आपापल्या वर्गात नेऊन बसवत असतं. २ शिक्षक, बसचे चालक आणि स्वतः मुख्याध्यापक हे काम पुढे होऊन करायच्या. प्रचंड अवघड काम आहे हे, शारीरिक आणि मानसिक आजार असलेल्या मुलांना शिकवणं. धडधाकट आणि बुद्दीने परिपक्कव असणाऱ्या मुलांना शिकवणं, कित्येकांना कंटाळवाणं आणि जिकिरीचे वाटतं. मात्र तेच इथले शिक्षक या मुलांचं शिक्षण आणि शाळेतील ५-६ तासांच संगोपन पुढे होऊन करतात. मी बऱ्याचदा पाहिलंय कि अशा मुलांना किती सांभाळून घ्यावं लागतं. त्यांच्याशी वागता-बोलताना खूप काळजी घ्यावी लागते.
“मानसिक अपंगत्व स्वीकारणे ही काही साधी सोप्पी गोष्ट नव्हे.” अशा मुलांसोबत कधी १ तास घालवून पहा तर माझ्या वाक्याबद्दल तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. या मुलांना खरंच मानलं पाहिजे कि तरीही ही मुले एका साधारण विद्यार्थ्यांसारखं शिक्षण घेतात. त्यांच्या पालकांविषयी तर एक वेगळाच आदर वाटतो. अशा मुलांना वाढवणं, संगोपन करणं खरंच खूप जबाबदारीचं काम आहे. शेवटी पालकच ते, अपंग असला तरी त्यांचं अपत्य सांभाळावं लागणार, मात्र कित्येक हाल अपेष्टा, कुचेष्ठा, तिखट शब्द ऐकून अशा मुलांना ते वाढवतात. त्याशिवाय त्या शिक्षकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. जेव्हा मी त्यांच्याकडून माहिती मिळवली तेव्हा समजलं, अशा ‘विशेष’ मुलांना शिकवण्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम असतो. सांगायचं इतकंच कि इतर ठिकाणीही ते शिक्षक काम करू शकले असते, पण तरी त्यांनी या मुलांना शिकवणं किंवा हे काम करणं पसंद केलं. ही बाब अभिमानास्पद वाटते मला, त्याचबरोबर आता त्या शाळेत अशीच मानसिक अपंगत्व झुगारून स्वतः हिमतीने शिकलेल्या आणि आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण केलेल्या शिक्षकांना संधी मिळते आहे. किती सुंदर ना, म्हणजे त्या मुलांना किती आभाळाएवढी प्रेरणा.
सरतेशेवटी इतकंच कि कोणतंही अपंगत्व स्वीकारून जर हे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात तर माझ्यासारखी धडधाकट तरुण मागे का राहतात ? आपला तर मेंदू बराच शाबूत आहे. ही गोष्ट मला सतत माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देते. दुसरे म्हणजे त्यांचे पालक जे अशा मुलांना सहन करतात, कितीही सहनशक्ती, मग आपल्यात पण अशी निर्माण व्हायला हवी ना. आपणही आपल्या नेहमीच्या जगात वावरताना अनेक गोष्टींवर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो, ती टाळण्यासाठी एक छोटी प्रेरणा. हे शिक्षक जे ५-६ तास अशा मुलांच्या सानिध्यात राहतात, त्यांच्या बऱ्याच उणिवा भरून काढतात. इतकंच नव्हे तर त्यांना पोषक असे वातावरण ते तयार करून देत असतात, सोबतच त्यांची शारीरिक आणि मानसिक काळजीदेखील घेतात. म्हणजे एकाच वेळी किती मोठमोठ्या गोष्टी शिकायला मिळतात ना. ही गोष्ट माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहते आणि माझा रोजचा दिनक्रम त्यांना प्रत्यक्षात पाहून सुरू होतो, एक वेगळी ऊर्जा मिळते आणि जी कधी ना संपते ना विसरते. अशीही एक माझी प्रेरणा ज्यामुळे मी स्वतःला माझ्या ध्येयांत जखडून ठेवलंय.
**************************************
7. श्रद्धा डफळ, पुणे
सूर्याची कोवळी किरणे
दवबिंदूंचे धुंद तराणे
रोजच देते प्रेरणा..
पुष्पाचे उमलत जाणे
मनातले अनोळखी गाणे
गाण्यामध्ये गुंतत जाणे
रोजच देते प्रेरणा,
शब्दांतून व्यक्त होणे…
चालताना पाऊल अडखळणे
सावरताना उभारी घेणे
रोजच देते प्रेरणा,
संयम अन् कष्टाचे चीज होणे…
कामाचा व्याप वाढणे
ती हातावेगळी होणे
रोजच देते प्रेरणा,
परिपूर्णतेची आस असणे…
आरशासमोर नटणे
स्वतःलाच प्रतिक्रीया देणे
रोजच देते प्रेरणा,
ऐटीत नखरे करणे…
भरारीसाठी गगनाचे खुणावणे
उडण्यासाठी पंखांचे फडफडणे
रोजच देते प्रेरणा,
ध्येयाची अविरत ओढ असणे…
मनमनांचे जोडत जाणे
आठवणींचे क्षण साठवणे
रोजच देते प्रेरणा,
नात्यांचे बहरत जाणे…
**************************************
8. पूजा डोंगरे , अकोला .
माझी रोजची प्रेरणा म्हणजे भूपाळी , रोज आन्हिकं उरकल्यावर पहाटे पहाटे भूपाळी म्हणणे , आपल्या गुरूंना , देवांना जागउन त्यांचा अभिषेक पूजा करून जेवढी होईल ती सेवा करणे .
खरचं खूप प्रसन्न वाटतं , माझा दिवसच असा सुरू होतो , आणि मन कसं सुंदर विचारांनी रोजच्या कामाला लागतं .मग समोर कितीही मोठ आव्हान असो , काय होईल असा विचार सुध्दा मनाला शिवत नाही .कारण माझा माझ्या गुरुवर , स्वामी महाराजा वर पूर्ण विश्वास आहे .माझ अहीत होईल असा माझ्या जीवनात काही घडुच शकत नाही .आपल्या पेक्षा आपल्या गुरूंना माहीत असतं आपल्या साठी काय योग्य आणि काय अयोग्य .
जीवन जगताना अडचणी सुख दुख अपमान .ह्या सर्वाना तोंड द्यावच लागतं पण हे सर्व पचवण्याची प्रेरणा मला माझ्या गुरूकडून मिळते , अशा .सुख – दुखच्या क्षणांनी तर आपलं जीवन बहरत असतं .
जीवन जगताना कोणाला कशी आणि कोणा कडून प्रेरणा मिळेल ते सांगता येत नाही , पण आपण आपलं प्रेरणास्थान समोर ठेऊन आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे फूलवू शकतो .
काही चुकल्यास क्षमस्व .
***********************************
9. © नवनीता (शैलेश भोकरे)
आता काय सांगू?
इंस्टाग्रामवर रोज लिहितो त्यामुळे मला कशातून प्रेरणा मिळेल सांगता येत नाही.
साधा डास जरी कानाजवळ गुणगुण करत असेल तर त्याची चिकाटी पाहून मला लिहायला सुचतं.
अंध बंधू दिसला की, मला त्याच्या सुंदर स्वभावामुळे आणि लढाऊ वृत्तीमुळे प्रेरणा मिळते.
डोंबारी पहिला की, मला त्याच्या कौशल्यावर आणि मुलीबद्दल लिहावंस वाटतं.
रस्त्यात पडलेल्या खड्ड्याला पाहून बदल घडवण्यासठी मला प्रेरणा मिळते.
गर्लफ्रेंड पाहिली (लोकांची. आपली असण्याचा प्रश्नच नाही!) तर खोटी निरागसता पाहून मला अभिनयासाठी प्रेरणा मिळते!!
भिंत पहिली की, दुसऱ्याला, न दमता आडोसा देण्यासाठी मला प्रेरणा मिळते.
आणखी खूप आहे… काय काय सांगू?
प्रत्येक घटनेतून आणि प्रत्येक घटकातून आजकाल मला प्रेरणा मिळते आणि मी कागदावर उतरवतो. दिसेल त्याच्यातला गुण किंवा वैशिष्ट हेरायचं आणि काय लिहिता येईल याचा विचार करायचा. यातच खरं तर दिवस निघून जातो आजकाल माझा.
लोकांचे अनुभव टिपून आपल्याला आणि त्यांना काय शिकता येईल हे दाखवून द्यायला माझी लेखणी मला सतत साथ देते.
माझ्या या तुम्ही वाचत असलेल्या लिखाणातूनही मला हेच सांगायचे आहे की,
घेऊ तिथून प्रेरणा मिळू शकते, शिकायला मिळू शकतं.
नाहीतर दृष्टी नसेल तर शिकवणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यावरचा पांढरा केस पाहण्यातच किंवा त्याच्या चूका पाहण्यातच आपला दिवस जाईल…
म्हणून आजूबाजूला सकारात्मक दृष्टीने पाहायला शिका.
निसर्ग प्रेरणा घेऊन उभा असतो सकाळी. सूर्यकिरण येतात घरात त्यांच्याकडे पहा. त्यांचं काम किती निष्ठेने करतात ते…
अशा अनेक गोष्टी तुम्हाला क्षणक्षणाला अगणित धडे देऊन जातील…
शिकायची इच्छा असू द्या!
************************************
10. ©सागर बरडे (इचलकरंजी)
सगळीकडे अंधार झाला होता. लाईट पण गेली होती. मनात थोडीफार भीती होती कारण त्या पूर्ण अंधारात मी एकटाच जागा होतो. साधारणतः १२:३० वाजत आले होते. सगळे जण निशब्द झाले होते. रात्रीची वेळ त्यामुळे सगळेजण सकाळी लवकर उठायचे म्हणून झोपून गेले होते. मी मात्र जागा होतो. झोप येत नव्हती मला. त्या अंधारात पण मला चर्चा करायची होती. मग मी जगातील एका महान मोठ्या माणसासोबत चर्चा करत होतो. तो म्हणजे मी. या अनंत विश्वात वावरणारा एक जीव. जो पूर्ण स्वतंत्र आहे असा मी.
कोण नव्हते बोलण्यासाठी म्हणून मी स्वतःशीच बोलू लागलो. खुप वेगवेगळे विचार मनात येत होते. पण मी त्या विचारांवर विचार करत असताना एक नवीनच विचार उत्पन्न होत होते. अचानक पणे लाईट आली. मी अगदी शांत झालो होतो. न जाणून माझी नजर समोर असलेल्या खिडकीकडे गेली. त्या खिडकीतून थोडासा प्रकाशझोत आत येत होता आणि त्यामुळे त्या चार भिंतींच्या स्वतंत्र नसलेल्या खोलीत अचानक थोडा थोडा प्रकाश जाणवू लागला. आणि माझे सगळे विचार जे त्या चार भिंतींच्या मधी बंदीस्त होते. ते अचानक त्या खिडकीतील प्रकाशाकडे आकर्षित होऊ लागले. असं जाणवू लागल कि त्या अंधारातील सर्व विचार हे त्या प्रकाशातून बाहेर फेकले जात होते. आणि त्या प्रकाशातील स्वतंत्र असणारे विचार माझ्या मनात येऊ लागले.
मनात एकदम धस्स-धीशी तो प्रकाश भरला. मनात खूप वेगळे विचार चालू झाले. चार भिंतींच्यामधी बंदिस्त कैद होतो मी. पण त्या प्रकाशातील विचारांनी मात्र मी स्वतंत्र झालो होतो. माझे विचार त्या प्रकाश येणाऱ्या खिडकीतून बाहेर पडू लागले. इतकेच नव्हे तर हळूहळू त्याची सीमा तुटत होती. आणि तेच विचार आकाशात एक उंच अशी गरुड भरारी घेऊ लागले.
चार भिंतीत बंदिस्त, गुलाम बनून राहणारा मी, पण त्या छोट्याश्या खिडकीतील प्रकाशामुळे मी स्वतंत्र झालो होतो. मी जरी बंदिस्त असलो तरी मात्र माझ्या विचारांनी सर्व बंधने तोडून या गगनात एक उंच भरारी घेतली होती. आता ही भरारी मात्र न थांबणारी होती. कारण याला कोणतेच बंधन, कोणतीच सीमा नव्हती. आता माझे विचार सुद्धा मला गप्प बसू देईनात. त्या विचारासोबत मला सुद्धा स्वतंत्र मिळू लागले. पण माझ्यात चार भिंतींची ती सीमा तोडण्याची ताकत नव्हती. पण अखेर माझ्या विचारांनीच ती सीमा तोडली होती. आणि माझ्यात पण एक अशी ताकत निर्माण झाली की, त्या सर्व बंधनांना मी तोडून त्या बंधणीय अंधारातून मला स्वतंत्र देणाऱ्या त्या प्रकाशात मी पाऊल टाकत होतो. अखेर मी ती सर्व अंधाराची बंधने तोडून टाकली आणि प्रकाशाच्या स्वातंत्र्यात मी एक नवीन जीवन जगण्याला सुरुवात केली. जिथे फक्त आणि फक्त मला स्वातंत्र होत. कुणाचेही बंधन नव्हतं, या विश्वातील एक विचारांनी स्वातंत्र झालेला. एक महान स्वरूप आज मी माझ्यातच पाहिलं.
खरंच जेव्हा आपल्या विचारांना कोणतेच बंधन नसेल तेव्हाच आपण स्वातंत्र होऊ शकेन. आज मला त्या खिडकी आणि त्यातून येणाऱ्या प्रकाशातून खूप काही शिकायला मिळाले. एका निर्जीव वस्तूतून एका सजीव बंदिस्त असणाऱ्याला स्वतंत्र मिळालं होत. नेहमी आठवण राहील त्या प्रकाशाची आणि त्या खिडकीची.
शेवटी इतकंच कि- स्वतःचे विचार बदला. विचारांनी स्वातंत्र मिळवा. जेव्हा तुमचे विचार स्वतंत्र होतील तेव्हा नक्कीच तुम्ही सुद्धा स्वतंत्र होणार. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पहा. खूप काही शिकायला मिळेल त्या गोष्टीकडून….
विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल.
धन्यवाद…!
*********************************
11. स्वप्नाली वेदपाठक
सोलापूर
प्रेरणा…या शब्दांत जादू ईतकी मोठी आहे कि हवी तशी व हवी तितकी प्रेरणा मिळते कि आपणाला…कधीही व कुठेही. या जीवनाचं खरं सोंदर्य पहात असताना मनाला नेहमी प्रश्न पडतो… रोज आपण कसे जगतो? अथांग अशा समुद्राच्या तळाशी खूप खजिने आहेत आणि तिथेच तर भलीमोठी शांतता असते….तो किनारा मला प्रेरणा देतो…माझं रोजचं जगणं…मला अजून सुंदर बनवायला. ज्या आईसमोर मी कधीकधी अव्यक्त असते तीला ठाऊक असतं. कि मला व्यक्त व्हायला कशाची गरज असते …अशावेळी तिने माझ्या हाती सोपवलेली ज्ञानेश्वरी मला लिहण्यासाठी प्रेरित करते…त्यातली ओवी…तो अर्थ मला भाव…भावनिकतेसोबतच याची जाणीव करून देतो मला सर्व नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक दिशेला रोज एक पाऊल टाकायचय…!!






